बांदा : ‘ओंकार’च्या वावराने शेतीचे नुकसान; भरपाईसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा

शेअर करा

बांदा,दि.२४ ऑगस्ट

हत्ती ‘ओंकार’च्या वावरामुळे पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानीचे पंचनामे व भरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पत्रादेवी येथील नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. व्हीआयपी सुरक्षा, वाहतूक व अन्य सुविधांसाठी प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने कार्यरत असताना, हत्तीच्या वावरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

“व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने काम करते. मग हत्तीच्या वावरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी हीच तत्परता का दिसत नाही?” असा सवाल शेतकरी शशिकांत महाले यांनी केला. “हत्तीच्या वावरामुळे आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई कधी मिळणार, हा प्रश्न आहे. प्रशासनाने व्हीआयपी कार्यक्रमांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या नुकसानीकडेही लक्ष द्यावे,” असेही महाले म्हणाले.

दरम्यान, ‘ओंकार’ला पाहण्यासाठी काही नागरिक अवघ्या तीन-चार मीटर अंतरावर जाऊन फोटो व व्हिडिओ काढत आहेत. हत्ती शांत असला तरी तो वन्यप्राणी असल्याने त्याच्या जवळ जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, गर्दी टाळावी आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, अशा परिस्थितीत वन्यजीव संरक्षणासोबत शेतकऱ्यांची भरपाई व नागरिकांची सुरक्षितता या तिन्ही बाबींवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शेअर करा