बांदा : कास देवस्थान वर्धापन दिनात देणगी टेबलवरून वाद; बांदा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी

शेअर करा

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सरपंचांना धक्काबुक्की व चावा घेतल्याचा आरोप; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

बांदा, दि. २९ मे

कास येथील देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या देणगी टेबलवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला असून या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या तक्रारीत कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी म्हटले आहे की, देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त देणगीसाठी लावलेल्या टेबलच्या कारणावरून वाद सुरू झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आपण मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता संबंधितांकडून धक्काबुक्की करण्यात आली तसेच हाताला चावा घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी प्रवीण पंडित यांनी अजिंक्य पंडित, सुमित पंडित, सुधीर पंडित, शशिकांत पंडित आणि सुनील पंडित यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तर दुसऱ्या बाजूने सुधीर बाबली पंडित यांनी देखील बांदा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, देणगीसाठी टेबल लावले असता संबंधितांनी येऊन धमकी दिली, टेबल हटवण्यास सांगितले तसेच धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुधीर पंडित यांनी प्रवीण पंडित, विठ्ठल पंडित, पांडुरंग पंडित, घनश्याम पंडित, नंदकिशोर पंडित, जयवंत पंडित आणि गोपाळ पंडित यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवस करीत आहेत.

शेअर करा