मनोज मुसळे यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर निवड
सिंधुदुर्ग,दि.२७ऑक्टोंबर
सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले कै. नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर अवघ्या २० दिवसांत शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्णय घेत सानिका हिला ग्राम महसूल अधिकारीपदाचा नियुक्ती आदेश प्रदान केला.
नायब तहसीलदार कै. मनोज मुसळे यांचे ११ आॅगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाये, या उद्देशाने त्यांची मुलगी सानिका मुसळे यांनी ७ आॅक्टोबर रोजी अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करत हा निर्णय घेतला. अर्ज सादर केल्यापासून अवघ्या २० दिवसांत नियुक्ती आदेश देण्यात आला. सोमवार २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते सानिका मुसळे हिला ग्राम महसूल अधिकारी (सजा तरंदळे, तहसीलदार कार्यालय, कणकवली) या पदाचा नियुक्ती आदेश प्रदान करण्यात. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुसळे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. याबद्दल मुसळे कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.