बांदा : अपघात रोखण्यासाठी इन्सुलीत रंबलिंग पट्टे बसवा : नितीन राऊळ

शेअर करा

बांदा ,दि.०२ जुन
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील इन्सुली हायस्कूल आणि संत सोहिरोबानाथ मंदिर परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने रंबलिंग पट्टे बसवावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राऊळ यांनी सावंतवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग उपअभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इन्सुली हायस्कूल व संत सोहिरोबानाथ मंदिर परिसरातील सर्व्हिस रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. यापूर्वीही या परिसरात अनेक अपघात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सदर ठिकाणी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, भाविक तसेच ग्रामस्थांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रंबलिंग पट्टे, आवश्यक वाहतूक सूचना फलक आणि अन्य सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही नितीन राऊळ यांनी केली आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा