Banda : आडाळी एमआयडीसी ला ३३ केव्ही वीजवाहिनी भूमिगत करा.

शेअर करा

पानवळ ग्रामस्थांची मागणी

बांदा,दि.०७ ऑक्टोंबर

इन्सुली येथून आडाळी एमआयडीसीकडे नेण्यात येणारी प्रस्तावित ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनी ओव्हरहेड पद्धतीने नेण्याऐवजी भूमिगत (अंडरग्राउंड) नेण्यात यावी, अशी मागणी पानवळ ग्रामस्थांच्या वतीने MIDC तसेच महावितरण कडे करण्यात आली.

याबाबत पानवळ ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश सावंत व सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे,कार्यकारी अभियंता (प्रशासन) योगेंद्र वाघ तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी श्री. कसबे यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सादर केले.

पानवळ परिसरातून जाणाऱ्या ३३ केव्ही अति उच्च दाबाच्या वीजवाहिनीमुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, वस्ती, शेती, शाळा-कॉलेज, बस स्टॉप तसेच रहदारीच्या परिसरातून उच्चदाब वीजवाहिनी नेल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून सदर वीजवाहिनी भूमिगत पद्धतीने नेण्यात यावी, अशी ग्रामस्थांच्या सहीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच भविष्यात वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीमुळे होणारा त्रास, वीजवाहिनीच्या मार्गातील अडथळे आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी भूमिगत वीजवाहिनीचा पर्याय अधिक सुरक्षित ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या मागणीचा महावितरण तसेच औद्योगिक विकास महामंडळाने गांभीर्याने विचार करून पानवळ ग्रामस्थांच्या हितासाठी ३३ केव्ही वीजवाहिनी भूमिगत करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी पानवळ ग्रामस्थांच्या वतीने जय सावंत यांनी केली आहे.
यावेळी महावितरण तसेच औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला व याबाबतचा प्रस्ताव तसेच सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल असे सांगितले.

शेअर करा