बांदा, दि.३० मे
बांदा एसटी स्थानकाच्या मागील परिसरात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उदय गोविंद सावंत (वय ५५, रा. मोर्येवाडी, बांदा) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मुलग्याच्या आजारपणामुळे आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी मृताचे भाऊ उमेश गोविंद सावंत यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिताकांत नाईक करीत आहेत.