बांदा,दि.२६ ऑगस्ट
गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहासात योग्य सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांची सखोल माहिती संकलित करून त्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले.
गोवा मुक्तिसंग्रामातील शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला आणि बलिदानाला अभिवादन करत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पत्रादेवी येथील हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. पोर्तुगीज राजवटीविरुद्धच्या ऐतिहासिक मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी राजनाथ सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्मारक परिसरात वृक्षारोपणही केले. स्मृती, संघर्षातून निर्माण झालेली जिद्द आणि भविष्यातील आशेचे प्रतीक म्हणून या वृक्षारोपणाकडे पाहिले जात आहे.

गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले, त्यापैकी एकाही व्यक्तीचे नाव इतिहासातून वगळले जाऊ नये, यासाठी सरकारने सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांची नावे दगडावर कोरून त्यांचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘मार्टर्स ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गोवा मुक्तिसंग्रामात देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग करणाऱ्या हुतात्म्यांचे देशप्रेम, शौर्य आणि पराक्रम या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्यव्यवसायमंत्री निळकंठ हळर्णकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळ देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आमदार प्रेमेंद्र विष्णू शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रविण आर्लेकर आणि जित आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदावेलू, आयएएस, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, आयएएस, गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, स्वातंत्र्यसैनिक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामाचा इतिहास केवळ १९४६ पासून सुरू झालेला नसल्याचे स्पष्ट केले. पोर्तुगीज राजवटीविरोधातील गोमंतकीयांचा संघर्ष त्यापूर्वी अनेक दशके सुरू होता, असे त्यांनी सांगितले.
कुंकळ्ळीचा ऐतिहासिक उठाव हा गोव्याच्या प्रतिकाराच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण अध्यायांपैकी एक असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केले. गोमंतकीयांनी पोर्तुगीज सत्तेविरोधात १९४६ च्या आंदोलनापूर्वीपासूनच स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला होता, असे त्यांनी नमूद केले.
गोव्याच्या मुक्तिसंग्रामाचा व्यापक इतिहास समोर आणण्यासाठी संशोधन, दस्तऐवजीकरण आणि हुतात्म्यांच्या योगदानाची नोंद करणे आवश्यक असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.