बांदा : मडुऱ्यात पथदिव्याचा खांब कोसळला; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

शेअर करा

बांदा ,दि.२३ जून
मडुरा गावातील श्री देव रवळनाथ मंदिराजवळ उभारण्यात आलेला पथदिव्याचा खांब पहिल्याच पावसात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अपघात टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या घटनेमुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यालगत उभारण्यात आलेले ११ केव्ही विद्युत खांबही धोकादायक अवस्थेत असून आवश्यक सुरक्षाव्यवस्था व गार्डिंगची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यासंदर्भात उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे गवंडे यांनी सांगितले. स्मार्ट मीटर बसविण्यावर भर देण्यापेक्षा मूलभूत सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून खांब सुरक्षितपणे उभारावा, कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी तसेच दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

शेअर करा