जि. प. सदस्य अपर्णा सातोसकर यांचाही शेतात सहभाग
बांदा,दि.०२ ऑगस्ट
शालेय शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड आणि जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, श्री कुलदेवता विद्यामंदिर, मळेवाड क्र. २ चा ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर यांनी स्वतः शेतात उतरून तरवा काढणी, भात लावणी तसेच ट्रॅक्टर चालवत विद्यार्थ्यांसमोर श्रमसंस्काराचा आदर्श ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
मळेवाड येथील प्रगतशील शेतकरी अमित नाईक यांच्या शेतात भरलेल्या बांधावरच्या शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक आणि पारंपरिक शेतीपद्धतीची माहिती देण्यात आली. शेतीसाठी योग्य खतांचा वापर, चिखलात गिरीपुष्पाच्या झाडाचा पाला मिसळल्याने होणारे फायदे, भातशेतीतील विविध टप्पे तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेतीची कामे प्रत्यक्ष अनुभवली.
यावेळी सावंतवाडीचे उपकृषी अधिकारी गव्हाणे, तालुका पर्यवेक्षक देसाई, कृषी सहाय्यक प्रियांका फरकुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित नाईक, मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, शिक्षक कळसुलकर, उपसरपंच हेमंत मराठे, अंगणवाडी सेविका पूर्वा नाईक, वैभव मोरूडकर, सगुण जाधव, प्रवीण मुळीक, सुरज मुळीक, बुद्धेश मुळीक, परेश नाईक, अस्मि नाईक, करिष्मा कुंभार, भाजप केंद्र प्रमुख शिवाजी कवडे, बांदा मंडळ उपाध्यक्ष ओंकार प्रभू-आजगावकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बांधावरची शाळा’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच शेतीचे प्रत्यक्ष अनुभवात्मक शिक्षण मिळाले असून, भविष्यात शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यास या उपक्रमाची मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.