अज्ञात महिला व पुरुषावर गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू!
सावंतवाडी,दि.३० ऑक्टोंबर
सावंतवाडी एसटी स्टँडवरून महिलेच्या पर्समधून १२ तोळे सोन्याचे दागिने लांबवले; अज्ञात महिला व पुरुषावर गुन्हा दाखल
सावंतवाडी मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरातून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी शिताफीने लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला २१/०९/२०२६ रोजी प्रवासासाठी सावंतवाडी एसटी स्टँड परिसरात आली होती. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची झिप उघडून आत ठेवलेले सुमारे १२ तोळे वजनाचे मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास केले. बसमध्ये चढताना किंवा परिसरात वावरताना ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित महिला व पुरुष कैद झाले आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ एसटी स्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये एक संशयित महिला आणि एक पुरुष संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आले आहेत. पोलिसांकडून या दोन्ही संशयितांचे शारीरिक वर्णन व तपशील जारी करण्यात आले आहेत.
सावंतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित व्यक्तींबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळून आल्यास तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच, एसटी स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.