एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकर तिठा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरणासह अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू; कामाच्या दर्जा व वेळेबाबत तडजोड खपवून घेणार नाही, आमदार निलेश राणे यांचा इशारा
कुडाळ,दि.३० ऑक्टोंबर
कुडाळ एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकरतिठा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे तसेच एमआयडीसी मधील अंतर्गत मुख्य रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या एकूण ३० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कुडाळ एमआयडीसी २१ व्या शतकातील अद्ययावत एमआयडीसी बनवणे हाच आपला ध्यास असून, कामाचा दर्जा आणि वेळेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी राणे यांनी दिला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसीच्या विकासासाठी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व त्यांनी मंजूर केल्या आहेत. कुडाळ शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. नवनवीन उद्योग आणणे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावर आपला भर आहे. एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांना या क्षेत्राबद्दल आत्मियता आहे, मात्र यापूर्वी कोणाही लोकप्रतिनिधीने त्यांच्यासोबत बसून रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या पायाभूत प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा केली नव्हती. आमदार झाल्यानंतर आपण हे सर्व विषय प्राधान्याने हाताळले आहेत.
एमआयडीसीतील क्रीडा संकुलाविषयी बोलताना ते म्हणाले की, माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या ‘क्रीडा प्रबोधिनी’च्या जागेवर हे भव्य स्टेडियम उभारण्यात येणार आहे. प्रभू यांची भेट घेऊन जागेची मागणी केली असता त्यांनी तातडीने होकार दिला. ही जागा क्रीडा प्रबोधिनीच्याच नावे राहणार असून, एमआयडीसीच्या माध्यमातून येथे क्रीडा संकुल विकसित केले जाईल.
नोव्हेंबर अखेरपर्यंत घनकचरा प्रकल्प पूर्ण केला जाईल. यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही दुर्गंधीयुक्त किंवा इतर त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.
मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या सभागृहाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून ते लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच शहरात दर्जेदार नाना-नानी पार्क आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची कामे लवकरच सुरू केली जातील.
मागील १० वर्षांतील विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढत असून, गेल्या पावणेदोन वर्षांत कोट्यवधींचा निधी मतदारसंघात आणला आहे. विरोधकांनी १० वर्षांत काय केले आणि मी पावणेदोन वर्षांत किती निधी आणला, याचा हिशोब मांडल्यास विरोधक उत्तर देऊ शकणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, कार्यक्रमाला एमआयडीसीचे उपअभियंता उशिरा पोहोचल्याने आमदार निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांचा उशीर चालणार नाही,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जि.प. उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर व संजय पडते, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे व दीपक नारकर, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.