मटका पूर्णपणे बंद असल्याचा दावा ठरतोय पोकळ; कारवाईने उघड झाली वस्तुस्थिती
सावंतवाडी, दि. ३० ऑक्टोबर
शहरात मटका जुगार पूर्णपणे बंद असल्याचा दावा केला जात असतानाच, सावंतवाडी पोलिसांनी एकावर कारवाई करत या दाव्याची पोलखोल केली आहे. सावंतवाडी नगर परिषदेच्या पाठीमागे मोबाईलवरून मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व साहित्य असा एकूण ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी नगर परिषदेच्या पाठीमागे ही कारवाई करण्यात आली. प्रवीण खटावकर (वय ३५, रा. कोलगाव चव्हाटावाडी, सावंतवाडी) असे नाव असून, तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरून ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव भुजबळ यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी हे करत असून, संशयिताला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNNS) कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. अविनाश पाटील, श्री परब आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल धुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे मटका चालकांचे धाबे दणाणले आहेत.