नो-पार्किंग झोनमध्ये सुरू असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
बांदा,दि.१६ जून
बांदा शहरातील पुलाखालील नो-पार्किंग झोनमध्ये सुरू असलेल्या वाहतुकीच्या समस्येबाबत समाजसेवक साईप्रसाद कल्याणकर यांनी पुढाकार घेत संबंधित विभागांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी एसटी प्रशासन व पोलीस विभागाची भेट घेऊन आवश्यक उपाययोजनांची मागणी केली.
कल्याणकर यांनी बांदा एसटी डेपोचे वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांची भेट घेऊन नो-पार्किंग झोनमधून एसटी बसची होत असलेली वाहतूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात या मार्गाचा वापर टाळण्यात यावा तसेच संबंधित चालकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर त्यांनी बांदा पोलीस ठाण्यात भेट देऊन पुलाखालील रस्त्यावरील नो-पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी संबंधित ठिकाणी रस्ता सुरक्षा आणि नो-पार्किंगबाबतचे सूचना फलक अपुरे असल्याचे निदर्शनास आले. तसेच उपलब्ध फलक बाहेरून येणाऱ्या पर्यटक व वाहनचालकांच्या सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी नसल्याने अनेकांना नियमांची माहिती होत नसल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे नो-पार्किंगविरोधात कारवाई करताना पोलीस आणि आरटीओ विभागाला नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असल्याचेही चर्चेत समोर आले. त्यामुळे प्रथम आवश्यक व ठळक सूचना फलक उभारणे, रस्ता सुरक्षा उपाययोजना पूर्ण करणे आणि त्यानंतरच कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला.
समाजसेवक साईप्रसाद कल्याणकर यांनी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक सूचना फलक बसवून नो-पार्किंग झोनमधील वाहतूक आणि पार्किंग समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी केली आहे. यामुळे वाहतूक शिस्तीला चालना मिळण्यासह नागरिक आणि पर्यटकांमध्ये नियमांविषयी जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.