बांदा : खंडित वीजपुरवठ्यावरून बांदा ग्रामस्थांचा महावितरणला घेराव

शेअर करा

अभियंत्यांना जाब; दुरुस्तीची कामे थांबवून वीजपुरवठा सुरळीत; कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

बांदा,दि. १९ ऑगस्ट
बांदा शहरातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शंभरहून अधिक ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या बांदा कार्यालयावर धडक देत प्रशिक्षणार्थी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे यांना घेराव घातला. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना ग्राहकांना भरमसाठ वीजबिले कशी दिली जातात, असा सवाल करत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला.
देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा संदेश महावितरणने दिला होता. मात्र, आधीच वारंवार वीजखंडित होत असताना पुन्हा दिवसभर वीज बंद ठेवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामस्थांनी अभियंता कांबळे यांना सोबत घेत काळसेवाडी, निमजगावाडी व इन्सुली खामदेवनाका येथे सुरू असलेली दुरुस्तीची कामे थांबवली. त्यानंतर दुपारी एक वाजता बांदा शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.


‘ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच कामे केली जातात का?’ असा थेट सवाल ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, सुशांत पांगम, अजय महाजन, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान यांच्यासह ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित करूनही ग्राहकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. दिवसभरात अनेकवेळा वीज ये-जा होत असताना नियमित वीजबिले आकारली जात असल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला.


बांद्यात स्मार्ट मीटरला विरोध असल्याचे स्पष्ट करत प्रथम विद्यमान वीजयंत्रणा सक्षम करून अखंडित वीजपुरवठा द्यावा, त्यानंतरच नवीन योजनांबाबत चर्चा करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तसेच वरिष्ठ अधिकारी बांद्यात येऊन समस्या सोडवेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. अभियंता कांबळे यांच्या टेबलवर मेणबत्ती पेटवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच हर्षद कामत, भाऊ वाळके, विठ्ठल वाळके, शुभम पांगम, निखिल मयेकर, सुनील माजगावकर, बिपीन येडवे, ओंकार नाडकर्णी, संदेश नाईक, मुन्ना खान, मोहसिन खान, प्रशांत कोचरेकर, पांडू नाटेकर, राकेश वाळके, गजानन गायतोंडे, शुभम साळगावकर, सर्वेश मुळ्ये, दादा साळगावकर, सिद्धेश शिरोडकर, राकेश विरनोडकर, समीर परब, दत्ताराम बांदेकर, दया साळगावकर, गौरव गवंडे, प्रसाद गायतोंडे, प्रतीक नार्वेकर, अर्णव स्वार यांच्यासह १०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.


‘आधी वीजपुरवठा सुरळीत करा!’


नवीन मीटर बसविण्यापेक्षा प्रथम विद्यमान वीजयंत्रणा सक्षम करून अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बांद्यात दाखल होऊन प्रश्न सोडवला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

शेअर करा