सकाळपासून महिलांचा ठिय्या; ग्रामपंचायत बंद असल्याने संताप : विशेष ग्रामसभा जाहीर, संबंधित दुकान बंद करण्यासाठी नोटीस
बांदा ,दि.०३ ऑक्टोंबर
निगुडे येथे ६१ वर्षीय आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी निगुडेतील महिला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर आक्रमक पवित्रा घेतला. घटनेनंतर ग्रामपंचायतीने केलेली कारवाई, तसेच संबंधित दुकान बंद करण्यासाठी केलेला पाठपुरावा याबाबत जाब विचारण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून सुमारे १०० ते १५० ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमले होते.
मात्र, ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने महिलांचा संताप वाढला. सरपंचांकडे कार्यालयाची चावी असतानाही कार्यालय का उघडले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तत्काळ पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहावेत, अशी मागणी केली. अखेर सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय उघडले.
महिलांनी सरपंच निगुडकर यांच्याकडे संबंधित दुकान बंद करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कोणता पाठपुरावा केला, याचा थेट जाब विचारला. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांच्याशी संपर्क साधून अधिकारी उपस्थित राहावेत व विशेष ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांनी महिलांची भेट घेतली. आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाईसाठी तपास सुरू असल्याचे सांगत ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, संबंधित दुकान आजच बंद झाले पाहिजे, अशी महिलांची ठाम मागणी होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून दुकान बंद करण्यास सांगण्यात आले.
ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित झाल्यानंतर संबंधित दुकानमालकाला दुकान बंद करण्याची नोटीस देण्यात आली. कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी दुकानास ग्रामपंचायतीची परवानगी व कर आकारणी आहे का, असा सवाल केला. यावर सरपंच निगुडकर यांनी कोणतीही कर आकारणी अथवा परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दुकान बंद करण्यासाठी तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, अशी भूमिका नितीन राऊळ यांनी मांडली.
विशेष ग्रामसभेत ठराव करून त्याची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासनाकडे पाठविण्याचे ठरले. त्यानुसार सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता विशेष ग्रामसभा घेण्याचे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी जाहीर केले.
यावेळी रोहिणी गावडे, संजना केसरकर, सविता गावडे, पोलीस पाटील सुचिता मयेकर, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पंडित, बाबू पंडित, सागर राणे, माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, उपसरपंच गौतम जाधव, सुप्रिया आसवेकर, वर्षा निगुडकर, समीक्षा गावडे, रवींद्र गावडे, शमिका नाईक, महेश सावंत, सर्वेश गावडे, शिवसेना शाखाप्रमुख सिद्धिविनायक गावडे, बाबू गावडे, रॉबर्ट फर्नांडिस, रामदास नाईक, एकनाथ मोरजकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.