देवगड-जामसंडे सर्व जिल्हा परिषद शाळेत २३ जून रोजी उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
देवगड, दि. २० जून
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी भव्य शालेय दप्तर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत देवगड-जामसंडे सर्व जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप करण्यात येणार असून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळणार असून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे असल्याचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर आणि पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोरकर आणि देवगड भाजपा मंडळाचे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष श्री. योगेश चांदोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.