२९ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
,देवगड,दि.२३ ऑगस्ट
देवगड तालुक्यातील मु. पो. तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक ‘अखंड हरिनाम सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण कृ. १ ते श्रावण कृ. ९ (दिनांक २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६) या कालावधीत या सात दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ नारळी पौर्णिमा उत्सवाने’ होणार आहे. या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत सुवर्ण श्रीफळ पूजन आणि मंदिरापासून सागरापर्यंत भव्य शोभायात्रा काढून सागर पूजन केले जाईल.
सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम:
- २९ ऑगस्ट (हरिनाम सप्ताह प्रारंभ): सकाळी ११ वाजता घटस्थापना करून नामसप्ताहाचा शुभारंभ होईल. दुपारी १२ वाजेपासून दर ३ तासांनी प्रत्येक वाडीनुसार अखंड हरिनाम जप चालणार आहे.
- २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर (दैनंदिन कार्यक्रम): सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १२.३० वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता सांज आरती आणि रात्री १०.३० वाजता चित्ररथासह दिंडी सोहळा पार पडेल.
या कालावधीत स्थानिक प्राथमिक शाळा तसेच आजी-माजी शालेय विद्यार्थी, मधिलवाडा, चिंचवाडा, पश्चिमवाडा, मुरमणेवाडा आणि संतवाडा या भागांतील ग्रामस्थांतर्फे विशेष आयोजनाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.
५ सप्टेंबर रोजी सांगता समारंभ:
५ सप्टेंबर रोजी सप्ताहाची सांगता होणार असून, या दिवशी सकाळी १० वाजता ग्रामस्थांसह दशावतारी भजन व निरोपगीत होईल. सकाळी ११ ते १२ या वेळेत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ते ब्राम्हणदेव मंदिर परिक्रमा आयोजित केली आहे. दुपारी १२ वाजता मंदिरासमोर दहीकाला (हंडी) व समुद्रस्नान पार पडेल, तर १२.३० नंतर वार्षिक गाऱ्हाणे आणि नवस फेडण्याचा कार्यक्रम होईल.
यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त मंडळ, अध्यक्ष श्री. सूर्यकांत रघुनाथ जोशी आणि तारामुंबरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.