गणेश चतुर्थीपूर्वी तालुक्यातील रस्ते, एसटी, वीज व अन्य समस्या मार्गी लावण्याच्या सूचना; १ सप्टेंबरला पालकमंत्री घेणार आढावा
देवगड ,दि.२५ ऑगस्ट
देवगड तालुक्यातील वेळगीवे अंगणवाडी मदतनीस गेल्या दोन वर्षांपासून गैरहजर असल्याने अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश सभापती गणेश राणे यांनी दिले.
देवगड पंचायत समितीची मासिक बैठक सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
फणसगावच्या सदस्या समृद्धी चव्हाण यांनी वेळगीवे अंगणवाडी मदतनीसांचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित मदतनीस नियुक्तीनंतर केवळ दोन महिने हजर राहिल्या असून त्यानंतर त्या मुंबईला गेल्या आहेत. त्यांना तब्बल दोन वर्षे झाली असून त्या अंगणवाडीत उपस्थित नसल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाने सुजाता लवू गिरी यांच्याशी पत्रव्यवहार केला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणतेही लेखी उत्तर प्राप्त झाले नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी अन्य सदस्यांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. संबंधित मदतनीसांना अंगणवाडीची गरज नसेल तर त्या ठिकाणी अन्य गरजू व्यक्तीला संधी देता आली असती, असे सदस्यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. अखेर सभापती गणेश राणे यांनी संबंधित मदतनीसांच्या गैरहजेरीबाबत सखोल चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना
गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी तालुक्यात दाखल होणार आहेत. मात्र जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांची अद्याप पुरेशी झाडाझडती झालेली नसून अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याचा मुद्दा रविंद्र तिर्लोटकर, सादिक डोंगरकर, सदाशिव ओगले, सलोनी तळवडेकर व विष्णू घाडी यांनी उपस्थित केला.
यावर सभापती गणेश राणे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ सप्टेंबरपूर्वी तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या.
चाकरमान्यांसाठी एसटीचे नियोजन आताच करा
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने गावागावात वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. खासगी बसेसच्या परतीचे नियोजन होत असताना मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन नसल्याने ऐनवेळी कमी भारमानाचे कारण देत बसफेऱ्या रद्द केल्या जातात, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.
गणेशोत्सवातील वाहतुकीचे नियोजन आतापासूनच करून त्याबाबतची माहिती गावागावात फलकाद्वारे प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी उपलब्ध गाड्यांच्या संख्येनुसार नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
आंबा-काजू नुकसानीपोटी २० कोटींची मदत
तालुका कृषी विभागामार्फत तालुक्यातील ८ हजार ७६३ खातेदारांना आंबा व काजू नुकसानीपोटी एकूण २० कोटी २१ लाख ७ हजार ५७९ रुपये प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी तालुक्यात हवामान यंत्रे बसविण्यासह बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.
वीज वितरण विभागाच्या कामकाजाबाबतही बैठकीत चर्चा झाली. गणेश चतुर्थीपूर्वी आवश्यक कामे हाती घेण्यात आली असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार कामे सुरू असल्याची माहिती वीज वितरणच्या अधिकारी छाया परब यांनी दिली.
दरम्यान, इंदिरा आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या काही घरकुलांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नसल्याचे सदाशिव ओगले यांनी निदर्शनास आणून दिले. ही जोडणी गणेश चतुर्थीपूर्वी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
समाजकल्याणच्या जागेला संरक्षण भिंत बांधण्याचे आदेश
समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीतील ३४ गुंठे जागेला अद्याप संरक्षण भिंत नसल्याचा मुद्दा सलोनी तळवडेकर यांनी उपस्थित केला. या विभागाच्या जागेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावर सभापती गणेश राणे यांनी संबंधित जागेची मोजणी करून घेऊन संरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना दिल्या.
पंचायत समिती सदस्यांनाही पेन्शनची मागणी
आमदार व खासदारांप्रमाणे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनाही पेन्शन देण्यात यावी, असा ठराव सदाशिव ओगले यांनी बैठकीत मांडला. गावपातळीवर हे लोकप्रतिनिधी अनेक वर्षे काम करतात. मात्र आमदार व खासदारांना एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पेन्शनची तरतूद आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना ती का मिळू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गणेश चतुर्थी उत्सवासाठी देवगड तालुक्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होणार असल्याने एसटी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणने आपापली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना सभापती गणेश राणे यांनी दिल्या.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी अवघड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न होणार आहे