देवगड : गणेशोत्सव काळात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला

शेअर करा

देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचे तहसीलदारांना निवेदन; १० ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बंद करण्याची मागणी

देवगड,दि.३१ ऑगस्ट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता, १० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास मधुकर साळसकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी देवगड तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन साद केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्यात गौण खनिजाची वाहतूक दररोज मोठ्या प्रमाणात होत असून सुमारे १०० ते १२५ अवजड वाहने या मार्गावरून धावत असतात. १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने मुंबईसह विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनांनी देवगड तालुक्यात दाखल होतात.

देवगड-निपाणी रस्ता हा वळणावळणाचा असून या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांना अवजड वाहनांचा अंदाज येणे कठीण होते. त्यातच गौण खनिज वाहतूक करणारी अवजड वाहने अनेकदा वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढत असल्याचे साळसकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अवजड वाहनांमुळे यापूर्वीही निरपराध सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे अनुभव आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन १० सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी तात्काळ सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीबाबत प्रशासनाने तातडीने विचार करून योग्य ते नियोजन व अंमलबजावणी करावी, अशी विनंती तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा