देवगड : पर्यावरण दिनानिमित्त मिठमुंबरी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

शेअर करा

पर्यावरण संवर्धन आणि सागरी जैवविविधतेबाबत केली जनजागृती

देवगड : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मौजे मिठमुंबरी येथील समुद्रकिनारी सावंतवाडी वनविभाग आणि विभागीय कांदळवन कक्ष, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमातून समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सागरी जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यात आली.

ही मोहीम उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, विभागीय वनाधिकारी कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका पाटील, वनक्षेत्रपाल कणकवली सुहास पाटील आणि कांदळवन कक्ष मालवणचे वनक्षेत्रपाल महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मिठमुंबरी समुद्रकिनारा हा ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा महत्त्वाचा अधिवास असल्याने या परिसराचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच इतर कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. कासवांच्या अधिवासाचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, परिमंडळ वनाधिकारी देवगड श्रीकृष्ण परीट, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, ग्रामस्थ लक्ष्मण तारी, रमेश तारी यांच्यासह मिठमुंबरी ग्रामस्थ, कासव मित्र, कांदळवन असोसिएट, कणकवली वनपरिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
समुद्रकिनारी पडलेला प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी शासन यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत असून, भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शेअर करा