शेवरे हद्दीतील प्रकार उघड; गोळा केलेल्या सिरिंज व काचेच्या बाटल्या शिरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे सुपूर्द
देवगड, दि. १९ जून
तालुक्यातील शेवरे गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या पियाळी नदीपात्रात जैववैद्यकीय (बायो मेडिकल) कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीचे पाणी अनेक ग्रामस्थांकडून पिण्यासाठी व इतर दैनंदिन वापरासाठी वापरले जात असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये वापरलेल्या सिरिंज, काचेच्या औषधांच्या बाटल्या व इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे संबंधित यंत्रणांसाठी बंधनकारक असताना तो थेट नदीच्या प्रवाहात टाकण्यात आल्याने पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.

या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांनी युवकांसह घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रातील काचेच्या बाटल्या, सिरिंज तसेच अन्य वैद्यकीय कचरा गोळा करून त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, वाहत्या नदीत जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य व संबंधित प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
मंगेश पवार, गोट्या राणे, ओमकार तावडे, विघ्नेश माळवदे, राज माळवदे तावडे, कुशल साटम, कुमार अनुभवणे ,पार्थ तावडे ,सोनू मोंडकर आदी उपस्थित होते
