सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान व युवा विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; रक्तदान क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
देवगड,दि.१४ जून
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, देवगड शाखा आणि युवा विकास प्रतिष्ठान, जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले देवगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्याम बुवा यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदान ही अत्यंत महान सेवा असून ती जात, धर्म, पंथ किंवा कोणताही भेद न मानता माणुसकीची नाळ जोडणारे कार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान क्षेत्रात अनेक संस्था आणि कार्यकर्ते सातत्याने कार्यरत असून त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहाराचंद तावडे, सचिव प्रकाश जाधव, युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश लाड, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आयोजक व कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तिर्लोट येथील रतनजी दळवी व मित्रमंडळ, श्री खवडे महागणपती मंडळ तारामुंबरी, सिंधू मिशन नारींगे तसेच नियमित रक्तदाते योगेश जाधव यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नितीन तुरणार यांनी जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व विशद केले तसेच उपस्थितांना रक्तदानाची शपथ दिली. या उपक्रमासाठी महेश शिरोडेकर, भावेश पटेल, अनुप वायंगणकर, पंढरीनाथ आचरेकर, वैभव वाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव वारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.