देवगड : पंचायत समिती देवगडच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

देवगड,दि.२३ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, विष्णू घाडी, अंकुश टुकरूल, स्नेहा अनभवणे, संजना लाड, शीतल तावडे, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, बांधकाम उपअभियंता अनिल तांबे, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजयकुमार जोशी, देवगड तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण तसेच नवजीवन ब्लड बँक, कणकवलीच्या व्यवस्थापक सुप्रिया पवार आणि त्यांची टीम उपस्थित होती.

या शिबिरात पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख, आरोग्य विभागातील कर्मचारी, शिक्षक तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

यावेळी सभापती गणेश राणे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, “रक्तदान हे सर्वोत्तम दान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घेणे ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन जाधव यांनी केले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्तदान शिबिर यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

शेअर करा