देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत मार्फत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन

शेअर करा

देवगड,दि.२३ जून

     महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघामार्फत निश्चित  करण्यात आलेल्या व 23 जून रोजी साजरा करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय एकल (विधवा) महिला दिनाचे आयोजन  देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयामार्फत करण्यात आले. 
 पतीच्या निधनामुळे निराधार झालेल्या व समाजातील रूढी प्रथा परंपरांच्या विळख्यात अडकून पडलेल्या महिलांना नव्याने आयुष्य जगण्याची उमेद निर्माण व्हावी व त्यांना विविध उत्पनाच्या साधनाची ओळख व्हावी आणि त्यासाठी शासनाच्या विविध शासकीय योजनाची  माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शहरातील महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी देवगड तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक व संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी श्री. प्रदिप कदम यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.
देवगड जामसंडे नगरपंचायत च्या मुख्याधिकारी सौ. गौरी पाटील यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत नगरपंचायत मार्फत शहरातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे मत मांडले. शहराच्या नगराध्यक्षा श्रीम. साक्षी प्रभू यांनी स्वानुभव मांडले व महिलांना सक्षम होण्याचे आवाहन केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती तथा उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत व पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

शेअर करा