२२ जून रोजी होणार शिबिर; रक्तगट, साखर, ईसीजी, हिमोग्लोबिनसह विविध तपासण्यांची सुविधा
देवगड :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ तरवाडी, पिरवाडी,आणि कावलेवाडी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर व भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या विशेष पुढाकारातून प्राथमिक आरोग्य केंद्र इळये व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या निवासस्थानी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांसह परिसरातील सर्व बंधू-भगिनी, माता तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी, रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखरेची तपासणी, मधुमेह तपासणी, हृदयविकार रुग्णांसाठी ईसीजी, कॅल्शियम तपासणी, कम्प्लीट ब्लड काउंट (सीबीसी), महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट (केएफटी) तसेच लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.
नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची ही चांगली संधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा बूथ क्रमांक ६५ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरवाडी-पिरवाडी-कावलेवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.