शेकडो विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना पाठविल्या
देवगड दि.१२
देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्यव.) विद्यामंदिरातील शेकडो विद्यार्थिनींनी अभिनव उपक्रम राबविला. देशसेवेसाठी घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतीय सैनिकांना या विद्यार्थिनींनी आपला भाऊ मानून स्वतः तयार केलेल्या राख्या आज प्रेमपूर्वक रवाना केल्या. याप्रसंगी देवगड पोस्टमास्तर श्री .तन्मय विजयकुमार जोशी , संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे , मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव व सौ.मानसी महेश मुणगेकर उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘देशाच्या सीमेवर लढणारा जवान म्हणजे आपल्या कुटुंबातीलच एक भाऊ’ या भावनेतून विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी आकर्षक आणि सुबक राख्या स्वतः तयार केल्या. प्रत्येक राखीमध्ये देशाच्या जवानांप्रती असलेला आदर, प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना गुंफलेली आहे.
सीमेवर प्रतिकूल हवामान, कठीण परिस्थिती आणि अनेक संकटांना सामोरे जात भारतीय जवान अहोरात्र देशाचे रक्षण करीत असतात. अशा जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीपासून हजारो किलोमीटर दूर असल्याची जाणीव होऊ नये, तसेच ‘देशातील प्रत्येक मुलगी तुमची बहीण आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे’ हा भावनिक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी हा उपक्रम राबविला.
प्रशालेतील शिक्षिका सौ.मानसी महेश मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, या राख्यांसोबत विद्यार्थिनींच्या शुभेच्छा आणि देशरक्षणासाठी मनःपूर्वक कृतज्ञताही पाठविण्यात आली आहे.
या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न झाला आहे. जामसंडे येथील गोगटे प्रशालेच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
“सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या मनगटावर राखी बांधता आली नाही, तरी जामसंडेच्या बहिणींनी प्रेमाचा धागा हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या वीर भावांपर्यंत पोहोचविला!” हा या उपक्रमाचा भावनिक संदेश ठरला आहे.
ह्या सर्व राख्या मराठा बटालियन दिल्ली हेडक्वार्टर येथून सैनिकापर्यंत पोचवल्या जातील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मान.एन.टी.कुर्लपकर ( अधिक्षक, डाकघर ओरोस) व श्री.तन्मय विजयकुमार जोशी ( पोस्टमास्तर देवगड ) यांचे मार्गदर्शन लाभले.