रक्तदान हेच श्रेष्ठदान; समाजहितासाठी भाजपकडून विविध उपक्रमांचे आयोजन – माजी आमदार अजित गोगटे
देवगड,दि. २१ जून
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार अजित गोगटे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान हे सर्वोत्तम दान असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा रक्तदान शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सभापती गणेश राणे, बाळ खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, प्रियंका साळसकर, महिला तालुकाध्यक्ष उषःकाल केळुस्कर, राजेंद्र वालकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, भाजप शहराध्यक्ष वैभव करगुटकर, सुभाष धुरी, संजय तारकर,मिलिंद माने, ज्ञानेश्वर खवळे, उल्हास मंचेकर, व्ही.सी. खडपकर,सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.