जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या उत्सवात नागरिकांची मोठी गर्दी; पालकमंत्री नीतेश राणे यांची लवकरच भेट
देवगड ,दि.१४ ऑक्टोंबर
देवगड शहरातील कॉलेज रोडनजीक पाटणकर कंपाऊंड येथे सुरू असलेल्या इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित नवरात्रोत्सव २०२६ ला चौथ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक सजावट, दांडियाचा उत्साह आणि विविध उपक्रमांमुळे उत्सवस्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी शिक्षकांसह अनेक नागरिकांनी उत्सवस्थळी उपस्थिती दर्शवली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे हे लवकरच उत्सवस्थळी भेट देणार असल्याने आयोजकांसह नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांच्या माहितीनुसार, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत हा नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा ‘उत्सव साधेपणाचा, संकल्प जलसंवर्धनाचा’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित करत जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
उत्सवाच्या कालावधीत दररोज विविध आकर्षक पारितोषिके देऊन निवडक कलाकारांचा सन्मान करण्यात येत आहे. लक्षवेधी चेहरा, बेस्ट स्माईल, बेस्ट कॉस्च्युम, इंद्रधनू इन्स्टा क्विन, इंद्रधनू इन्स्टा किंग, किंग ऑफ दांडिया नाईट आणि क्विन ऑफ दांडिया नाईट यांसह विविध प्रकारची बक्षिसे देण्यात येत आहेत.
या उत्सवाची सांगता २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता आयोजित ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी’ या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये ‘भारत का अमृत कलश’ विजेता व ‘होऊ दे धिंगाणा’ फेम गायक सिद्धेश जाधव तसेच ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम गायिका तृप्ती कुडाळकर सहभागी होणार आहेत.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मनोरंजनासोबतच जलसंवर्धनाचा सामाजिक संदेश देणाऱ्या इंद्रधनू देवगडच्या या उपक्रमाला नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्सवाची रंगत वाढवत आहे.