देवगड : सागरी कासव संरक्षण व कोळंबी निर्यातीसाठी TED बसवणे आता बंधनकारक

शेअर करा

देवगड येथे निशुल्क वाटप व फिटमेंट प्रात्यक्षिक

देवगड, १२ ऑगस्ट

येत्या १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामाची तयारी म्हणून देवगड येथे ट्रॉलर जाळ्यांमध्ये TED (Turtle Excluder Device – कासव बहिर्गमन साधन) वाटप व फिटमेंट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. हे TED सर्व ट्रॉलर नौकाधारकांना शासनाकडून निशुल्क देण्यात येत आहेत.


अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “TED बसविणे हे केवळ सागरी कासवांचे संरक्षण करण्यासाठी नाही, तर भारतीय जंगली कोळंबीला आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय निकष पूर्ण करून विशेषतः अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या निर्यात बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.” कंपनी मार्फत आलेले तज्ञ गोपीनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी TED फिटमेंटचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले.


कार्यक्रमात आनंदवाडी येथील सर्व नौका मालक व तांडेल उपस्थित होते. देवगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. द्वजिकांत कोयंडे, देवदुर्ग संस्थेचे सचिव कृष्णा परब यांच्यासह परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या हस्ते TED वाटप करण्यात आले. सागरी सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पाडले.


ट्रॉलिंगदरम्यान कासवे व इतर मोठे सागरी प्राणी जाळ्यात अपघातीरीत्या अडकणे टाळून त्यांना सुरक्षितपणे समुद्रात बाहेर पडण्याचा मार्ग TED उपलब्ध करून देते. केंद्र शासनाच्या सागरी मत्स्यव्यवसाय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही ट्रॉल जाळ्याच्या कोड-एंडमध्ये TED बसविण्याचा उल्लेख आहे.


भारताच्या समुद्री उत्पादन निर्यातीत कोळंबी सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७,४१,५२९ मेट्रिक टन गोठविलेल्या कोळंबीची निर्यात होऊन सुमारे ४३,३३४ कोटी रुपये (५.१७७ अब्ज डॉलर) मिळाले. अमेरिका हा प्रमुख आयातदार राहिला. अमेरिकेच्या Public Law १०१-१६२, कलम ६०९ अंतर्गत जंगली कोळंबी कासवांना हानी न पोहोचवणाऱ्या पद्धतीने पकडलेली असावी लागते. MPEDA च्या माहितीनुसार TED अंमलबजावणी नसल्याने भारताला अद्याप अमेरिकन सर्टिफिकेशन मिळालेले नाही. यामुळे दरवर्षी अंदाजे ४,५०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान व निर्यात दरात सरासरी ४२ टक्के घट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
TED मुळे by-catch कमी होतो, सागरी परिसंस्थेचे संतुलन राखले जाते आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळते. देवगडमधील या उपक्रमाने मच्छिमारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे व त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

शेअर करा