देवगड : रंगीत खडूंमधून साकारला आप्पासाहेब गोगटेंचा जिवंत भासणारा चेहरा; मृत्युंजय मुनगेकर यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक

शेअर करा

श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षकांची अनोखी कलासाधना; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतून कला जपण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न

देवगड,दि.१६ जून

कला ही केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाजातील थोर व्यक्तींचे कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे. याच भावनेतून श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यालय, जामसंडे येथील कलाशिक्षक मृत्युंजय मुनगेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कलाविष्काराची छाप उमटवली आहे.


माजी आमदार तथा कैलासवासी आप्पासाहेब गोगटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुनगेकर यांनी विविध रंगीत खडूंचा वापर करून त्यांचे आकर्षक आणि जिवंत भासणारे चित्र रेखाटले. या उत्कृष्ट कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून सर्व स्तरांतून त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे.


मृत्युंजय मुनगेकर हे शाळेतील विविध धार्मिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने आकर्षक चित्रे आणि रांगोळ्यांद्वारे आपली कला सादर करत असतात. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींना विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि नागरिकांकडूनही नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.


आप्पासाहेब गोगटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारलेल्या या चित्रातून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली असून, मुनगेकर यांच्या कलागुणांचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. त्यांच्या या कलाकृतीचे शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत आहे.

शेअर करा