न्याय्य मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप; राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मेळावा, देवगड अणुऊर्जा प्रकल्पालाही तीव्र विरोध.
देवगड,दि.२३ जून
आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचा न्याय्य मागण्यांसाठी गेली पाच-सहा महिने आंदोलने करूनही सरकारचे डोळे उघडले नाही व सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही यामुळे बागायतदार शेतकरी यांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 3 जुलै रोजी आंबा बागायतदार शेतकरी यांचा भव्य मेळावा घेवून जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचबरोबर देवगड येथे होवू घातलेल्या विनाशकारी अणुउर्जा प्रकल्पालाही आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून देवगड तालुक्यातच नव्हे तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातही हा प्रकल्प कुठेही होवू देणार नाही असा इशारा आंबा काजू बागायतदार व व्यापारी माहसंघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिला.
जामसंडे येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ढोके यांनी आंबा बागायतदार व शेतकरी संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.यावेळी गणेश गावकर, प्रशांत शिंदे, किरण टेंबुलकर, अजय नाणेरकर, राजीव वाळके, दिनेश धुवाळी, शरद वाळके, गणेश वाळके , निलेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी काका ढोके म्हणाले, संघटनेच्यावतीने आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा न्याय मागण्यांसाठी विविध आंदोलने छेडण्यात आली मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही.यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचा बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 3 जुलै रोजी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांचा बळी गेल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही.पावसाळी अधिवेशन सुरू असून जलसमाधी आंदोलनातून एखाद्या बागायतदाराचे बलीदान गेले तर त्याचा बलीदानातून इतर बागायतदारांना तरी पावसाळी अधिवेशनातून शासन न्याय देईल असा उपरोधिक टोला त्यांनी लगावाला.एकीकडे आंबा बागायतदार शेतकरी यावर्षी मोठ्या संकटात असताना शासनाने तुटपुंजी मदत देवून त्याची थट्टा केली तर दुसरीकडे अणुउर्जासारखे विनाशकारी प्रकल्प देवगडमध्ये आणून आंबा बागायतदारांच्या बागा उध्वस्त करू पाहत आहे.या प्रकल्पाला संघटनेचा तीव्र विरोध असून यासाठी आंबा बागायतदार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा काका ढोके यांनी दिला.यावेळी त्यांनी अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मुणगे व हिंदळे पंचक्रोशीतील नागरिकांचेही कौतूक करून त्यांचा पाठीशीही संघटना ठामपणे उभी राहील असे यावेळी सांगतले.
गणेश गावकर म्हणाले बागायतदार उध्वस्त झाला असताना तो रस्त्यावर उतरूनही शासनाला जाग आली नाही.220 रूपये नुकसानभरपाई देवून भाजपाने शेतकऱ्यांचा खिजविण्याचे काम केले आहे.ही मदत शासनाने स्वत:चा फंडपेटीत जमा करून घ्यावी.बागायतदार संघटना आपल्या मागणीवर ठाम असून आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रूपये मदत द्यावी हीच ठाम मागणी असल्याचे गावकर यांनी सांगीतले.
त्याचबरोबर शासनाला अणुउर्जासारखा घातक प्रकल्प माथ्यावर आणून आंबा व काजू बागायतदार यांना बेघर करायचे आहे.अणुउर्जा प्रकल्पाविरोधात मुणगे ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनाला आमच्या संघटनेचाही पाठींबा असून हा विनाशकारी प्रकल्प देवगडमध्ये नव्हे तर जिल्ह्यात होवू देणार नाही असा इशारा गावकर यांनी दिला.विनाशकारी प्रकल्प आणण्यापेक्षा पर्यटनात्मक प्रकल्प आणा आम्ही तुमच्या पाठीशी राहू.अणुउर्जा प्रकल्पाचा माध्यमातून नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहेत मात्र भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन गावकर यांनी केले.मिठबांव येथील एमटीडीसारख्या पर्यटनात्मक प्रकल्पाकडे लक्ष द्यायला वेळ नाही मात्र विनाशकारी प्रकल्प आणण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे असा आरोप यावेळी गावकर यांनी केला.या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असून प्रकल्प विरोधासाठी देवगड तालुका अणुउर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे गावकर यांनी सांगीतले.
किरण टेंबुलकर म्हणाले, अणुउर्जासारखे घातक प्रकल्प आणून कोकण संपविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत.कोकणात निसर्गाने दिलेले सौंदर्य अदानी, अंबानी यांच्या डोळ्यात खुपते आहे.त्या सौंदर्याचा ऱ्हास करण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनात्मक प्रकल्प आणा आम्ही त्याचे स्वागत करू मात्र अणुउर्जासारखे घातक प्रकल्प लादले जात आहेत ते प्रकल्प भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात व गोवा या राज्यात करा.वाईट विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात लादले जातात मात्र चांगले प्रकल्प गुजरातमध्ये नेत आहेत.अणुउर्जासारख्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राजकारण बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र यावे व मुणगे व हिंदळे गावातील नागरिकांच्या पाठीशी राहावे असे आवाहन टेंबुलकर यांनी केले.हा लढा आता थांबणार नाही शेतकरी व बागायतदारांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.