देवगड,दि.२७ ऑगस्ट
समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारीच्या नव्या हंगामाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्याचा नारळी पौर्णिमेचा उत्सव देवगड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारपासून खोल समुद्रातील मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
देवगड येथील तारामुंबरी, मळई तसेच देवगड समुद्रकिनारी भागात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड बंदरावर तहसीलदार शीतल जाधव यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.
यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे, पोलीस निरीक्षक शाम बुवा, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे, कस्टम निरीक्षक एस. व्ही. पेडणेकर, प्रवीण सावंत, पतन विभागाचे सुमित रोकडे, बंदर विभागाचे मुकुंद खुडे, शिवराम निकम, सतीश खानविलकर यांच्यासह शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामसंडे-मळई खाडीकिनारी बाल मंडळाच्या वतीने संगीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मळई येथे सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मच्छीमारांच्या नौकांना आकर्षक पताकांनी सजविण्यात आले होते.
मळई येथील ग्रामस्थ मुरारी भाबल यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती व गाऱ्हाणे करून नौकांमधून मळई ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी समुद्राला नारळ अर्पण केला.
या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचोकर, प्रदोष कोयंडे, जयप्रकाश कोयंडे, रुपेश मणचोकर, सचिन मुणगेकर, अजित कोयंडे, सुरेश मणचोकर, अनिकेत कोयंडे, नासीर खान, सतीश कोयंडे यांच्यासह मळई ग्रामस्थ, मच्छीमार आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
तारामुंबरी येथेही सागराला सुवर्णश्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता तारामुंबरी विठ्ठल मंदिरापासून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने समुद्रपूजन करून मच्छीमारांनी नव्या मासेमारी हंगामासाठी सागराला नारळ अर्पण केला.