सागराला श्रीफळ अर्पण करून मच्छीमार बांधवांकडून सुख-समृद्धीची प्रार्थना
देवगड,दि.२७ ऑगस्ट
देवगड बंदर येथे गुरुवारी (२७ ऑगस्ट) पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासन, पोलिस यंत्रणा, मच्छीमार, उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. सागर शांत राहावा आणि मच्छीमार बांधवांना आगामी मासेमारी हंगामात सुखरूप व समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

नारळी पौर्णिमेनिमित्त देवगड बंदरावर पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर सागराला श्रीफळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याचे आवाहन करण्यात आले. मच्छीमार समाजासाठी विशेष महत्त्व असलेल्या या उत्सवामुळे देवगड बंदर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला उद्योजक नंदकुमार घाटे, देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा, तहसीलदार शितल जाधव, परवाना अधिकारी किरण वाघमारे, कस्टम निरीक्षक पेडणेकर, देवगड बंदर कर्मचारी प्रकाश खुडे, पत्तन कार्यालयाचे सुमित रोडगे, सतीश खानविलकर, शिवराम निकम, मिलिंद माने, राजू जगताप, शरद शिंदे, जयराम घाडी, शामकांत शेडगे, कृष्णा परब, सुधीर देवगडकर, वाहतूक पोलीस हवालदार प्रवीण सावंत, प्रसाद आचरेकर, महिला पोलीस गंगा येडे, प्रवीणा आचरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, तालुक्यातील तारामुंबरी, मळई तसेच विविध खाडीकिनारी आणि देवगड समुद्रकिनारीही मच्छीमार बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. पूजा-अर्चा करून सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यानिमित्ताने समुद्रकिनारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
