ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी देणारे दीक्षित महिला महाविद्यालय ठरणार महत्त्वपूर्ण केंद्र
देवगड,दि.२३ ऑगस्ट
शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना चिंतन करायला शिकविणारे माध्यम आहे. चिंता पेक्षा चिंतनशील समाजच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार व वेगळ्या पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.
विद्या विकास मंडळ संचलित श्रीमती नीता निळकंठ दीक्षित महिला महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात मोरेश्वर जनार्दन गोगटे जामसंडे हायस्कूलच्या नलावडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. प्रसाद देवधर व दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड अजितराव गोगटे प्रवीण जोग, दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, प्राचार्य सौ विमल बलवान, ॲड अभिषेक गोगटे अँड. अविनाश माणगावकर, महेश रानडे, प्रशांत वारीक, नम्रता तावडे, संतोष कुलकर्णी, राजेंद्र वालकर, संतोष किंजवडेकर मुख्याध्यापक सुनील जाधवआदी उपस्थित होते.
विदेशात ज्याप्रकारे शिक्षणाकडे पाहिले जाते.त्याप्रमाणे आपल्याकडे पाहिले जात नाही अशी खंत व्यक्त करून प्रसाद देवधर पुढे म्हणाले, समाजाचे चिंतन आपल्याला चिंतन करायला शिकवते, तर शिक्षण मूलतः चिंतन करायला शिकवते. समाज जेव्हा आपल्या प्रश्नांवर चिंतन करू लागतो, तेव्हा तो प्रगती करतो, असे शिक्षण म्हणजे गाव सोडणे नाही आणि अति शिक्षण म्हणजे देश सोडणे असे होत नाही.,” सद्यस्थितीत ज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणारी पिढी निर्माण होण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी, मंदिरात देवासमोर डोके ठेवणारी माणसे अनेक आहेत; मात्र ज्ञान मिळवून समाजाच्या विकासासाठी योगदान देत देवासमोर डोके ठेवणारी पिढी निर्माण झाली, तर समाजात निश्चितच बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी आई-वडिलांच्या नावाने कोकणातील पहिले महिला महाविद्यालय सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या उपक्रमासाठी विद्या विकास मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे त्यांनी विशेष आभार मानले.
अँड. अविनाश माणगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेतील मर्यादित सोयी-सुविधांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील शिक्षकांना तुटपुंज्या सुविधा उपलब्ध असताना अशा परिस्थितीत पारंपरिक शिक्षणापेक्षा ,पर्यटनात्मक अशाप्रकारचे वेगळ्या पद्धतीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. विद्या विकास मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. दीक्षित कुटुंबाने ग्रामीण भागातील शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड अजितराव गोगटे यांनी देखील महिला महाविद्यालयाची स्थापनेची प्रक्रिया कशी सुरू झाली याबाबत माहिती देऊन आगामी काळात हे महिला महाविद्यालय सर्व कसोटी मध्ये पात्र ठरेल.अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड अभिषेक गोगटे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ रेश्मा जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य विमल बलवान यांनी व्यक्त केले.
