Devgad news : मिठमुंबरी बागवाडीतील ‘कायगो कयाकिंग’ प्रकल्पाला विरोध; सात जणांविरोधात देवगड पोलिसांत गुन्हा दाखल

शेअर करा

जलक्रिडा व्यवसायाच्या शुभारंभाला अटकाव केल्याचा आरोप; आंदोलन आणि जलसमाधी घेण्याची धमकी दिल्याची फिर्याद

देवगड,दि.२६ऑक्टोंबर

मिठमुंबरी बागवाडी येथे प्रस्तावित असलेल्या ‘कायगो कयाकिंग’ जलक्रिडा व्यवसायाच्या शुभारंभाला विरोध केल्याप्रकरणी सात जणांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश सखाराम डामरी (वय ५७, रा. मिठमुंबरी आडवाडी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मिठमुंबरी बागवाडी येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश डामरी हे आपल्या सहकाऱ्यांसह ‘कायगो कयाकिंग’ या जलक्रिडा व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मिठमुंबरी बागवाडी येथे गेले होते. या व्यवसायासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या असून शुल्कही भरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र, व्यवसाय सुरू करण्यास विरोध करण्याच्या उद्देशाने काही जण संबंधित ठिकाणी जमले होते. त्यांनी बागवाडी जेटीवर जाऊन बेकायदेशीर जमाव जमवला आणि जलक्रिडा व्यवसायाचा शुभारंभ करण्यास अटकाव केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, या व्यवसायाविरोधात आंदोलन करण्याची, जलसमाधी घेण्याची आणि संबंधित ठिकाणी व्यवसाय सुरू न करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी प्रमोद आडकर, उमेश तारी, रमेश तारी, अभय पराडकर, सत्यवान नेसवणकर, निलेश तारी आणि रुपेश नेसवणकर (सर्व रा. मिठमुंबरी बागवाडी, ता. देवगड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), १८९(२), १९० आणि ३५१(२) अन्वये २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उगलमुगले करीत आहेत.

शेअर करा