देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या हस्ते लाभांचे वितरण; कृषी विभागाकडून ‘गोकृपा अमृत’ प्रात्यक्षिक
देवगड, दि. २० जून
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत नाचणी पीक उत्पादनाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासक शामल अनभवणे, प्रशासकीय समिती सदस्य अभय बापट, ग्रामपंचायत मोंडपारचे प्रशासक गणेश तिर्लोटकर, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, मंडळ कृषी अधिकारी संभाजी जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी दीपक सांगोळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांचे स्वागत केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच नाचणी बियाणे वाटप उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत प्रतिनिधींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती सेस फंडातून निवड झालेल्या दोन लाभार्थ्यांना घरघंटीचे वितरणही करण्यात आले. सभापती गणेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरघंट्या प्रदान करण्यात आल्या.
तसेच कृषी विभाग, देवगड यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘गोकृपा अमृत’ या सेंद्रिय घटकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामुळे नैसर्गिक शेती व सेंद्रिय उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घेत लाभाचा लाभ घेतला.