सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन; २३ जुलैला पंढरपूर मुक्काम तर २७ जुलैला सांगता
देवगड,दि.१५ जून
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तारामुंबरी यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी श्री संत सोपान महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, येत्या ८ जुलै रोजी वारीचे प्रस्थान होणार आहे.
वारीची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे देवता व वीणा पूजनाने होईल. त्यानंतर पंचपदी झाल्यावर सकाळी ९ वाजता पायी वारी मार्गस्थ होणार आहे. तारामुंबरी नाक्यावरून मुख्य मार्गाने पुढे जात ही वारी श्री संत बाळूमामा देवालय, कोंडामा येथे दुपारच्या महाप्रसादासाठी विसावणार असून, रात्रीचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिर, हडपीड येथे करण्यात येणार आहे.
दि. १२ जुलै रोजी सासवड येथे मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर वारी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. पालखी रथामागे दिंडी क्रमांक ८२ सहभागी होणार असून, दि. २३ जुलै रोजी पंढरपूर येथे मुक्काम असेल.
यानंतर परतीचा प्रवास पूर्ण करून दि. २७ जुलै रोजी पायी वारीची सांगता करण्यात येणार आहे. सांगता सोहळा श्री ब्राह्मणदेव मंदिर ते तारामुंबरी या मार्गावर संपन्न होणार असून, दुपारी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे गंगापूजनाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच मंदिराचे होडेकरी व मानकरी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र आषाढी पायी वारी व पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी यांनी केले आहे.