देवगड: सिंधुदुर्गच्या पर्यटनाला ताजची नवी झळाळी; पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा

शेअर करा

३२ वर्षांची प्रतीक्षा संपली; पर्यटन व रोजगाराला मिळणार चालना — भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील

देवगड,दि. १८ ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ समूहाचे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन आणि स्थानिक संस्थांमध्ये त्रिपक्षीय करार पूर्ण झाला असून, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळून अनेक वर्षे झाली असली तरी जिल्ह्यात उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा आणि पंचतारांकित निवासव्यवस्थेची कमतरता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर शिरोडा-वेळागर येथे साकारत असलेला ताज समूहाचा प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या पंचतारांकित हॉटेलमुळे देश-विदेशातून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पर्यटनावर आधारित हॉटेल व्यवसाय, वाहतूक, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने आणि अन्य पूरक व्यवसायांनाही याचा मोठा फायदा होऊ शकतो.

शिरोडा-वेळागर येथे सुमारे १४२ खोल्यांचे हे पंचतारांकित हॉटेल प्रस्तावित असून, पुढील तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. ताजसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेल समूहाची सिंधुदुर्गातील उपस्थिती जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला अधिक व्यापक ओळख मिळवून देणारी ठरणार आहे.

कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

पंचतारांकित हॉटेलमुळे केवळ पर्यटकांना सुविधा मिळणार नसून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, पर्यटनपूरक व्यवसायांना चालना आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे सिंधुदुर्गवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे.

भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांनी या प्रकल्पाचे स्वागत करताना, सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी अशा दर्जेदार प्रकल्पांची गरज असल्याचे सांगितले. ताज हॉटेल प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला निश्चितच मोठी चालना मिळेल,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला

शेअर करा