देवगड : समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम; नगरसेविका प्रणाली माने,मिलिंद माने यांच्याकडूनमहिलांना छत्री वाटप

शेअर करा

प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी सातत्याने लोकोपयोगी उपक्रम; माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते शुभारंभ

देवगड,दि. २२ जून

प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या हितासाठी सातत्याने विविध समाजोपयोगी आणि लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या नगरसेविका प्रणाली माने,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांनी यंदाही एक स्तुत्य उपक्रम हाती घेत नागरिकांना मोफत छत्रींचे वाटप केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी बोलताना माजी आमदार अजित गोगटे यांनी नगरसेविका प्रणाली माने यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रभागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या सातत्याने विविध उपक्रम राबवत असून छत्री वाटपासारख्या उपक्रमांचा महिलावर्ग तसेच नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसाळ्यात अशा साहित्याची नितांत गरज असते आणि या उपक्रमामुळे अनेकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नगरसेविका प्रणाली माने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी काम करताना नेहमीच समाधान मिळते. नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून समाजहित जपणारे असे उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधीने राबविणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा उपक्रमांना यश मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


या कार्यक्रमास माजी आमदार अजित गोगटे, भाजप ज्येष्ठ नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजप शहराध्यक्ष वैभव करगुटकर, नगरसेवक निवृत्ती तारी,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने, ज्ञानेश्वर खवळे, उल्हास मंचेकर,बापू जुवाटकर,भाऊ पारकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य, शिक्षण, सामाजिक मदत आणि अन्य लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या नगरसेविका प्रणाली माने यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

शेअर करा