देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला बिगर यांत्रिकी पारंपारिक रापण संघ मच्छीमार बांधवांचा तीव्र विरोध

शेअर करा


कुणकेश्वर येथे झालेल्या रापण संघाच्या बैठकीत आक्रमक भूमिका; मासळी उत्पादन घटल्याने नुकसानभरपाईचीही मागणी


देवगड,दि.३० जून

देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला पारंपारिक मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवित आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत देवगड तालुक्यात होऊ नये, अशी ठाम भूमिका बिगर यांत्रिकी पारंपारिक मच्छीमार रापण संघाच्या मंगळवारी (३० जून) सायंकाळी कुणकेश्वर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आली.


या बैठकीत तालुक्यातील १८ रापण संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदाच्या मासेमारी हंगामाच्या सुरुवातीपासून अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याने पारंपारिक मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन पारंपारिक मच्छीमारांना तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.


तसेच देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प उभारल्यास समुद्रातील जैवविविधतेवर तसेच मासेमारी व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हजारो मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती उपस्थितांनी व्यक्त केली. मच्छीमारांच्या हिताला बाधा पोहोचविणारा कोणताही प्रकल्प स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध भागांतील मोठ्या संख्येने मच्छीमार उपस्थित होते.

शेअर करा