देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

शेअर करा

शैक्षणिक साहित्य वाटप, दत्तक विद्यार्थी योजना, रुग्णसेवा आणि मच्छी विक्रेत्या महिलांना छत्री वाटपातून वाढदिवस साजरा

देवगड,दि.२३ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा देवगड-जामसंडे शहराच्या वतीने सोमवारी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर आयोजित कार्यक्रमांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमांची सुरुवात सकाळी श्री देव ब्राम्हणदेव मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर जि.प. शाळा तारामुंबरी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम तारामुंबरी बूथ कमिटी व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.


श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर, जामसंडे येथे शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने पाच गरजू विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा दत्तक विद्यार्थी उपक्रम राबविण्यात आला. तसेच जि.प. शाळा जामसंडे-खाकशी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जि.प. शाळा मळई येथे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन दिले.


ग्रामीण रुग्णालय, देवगड येथे जेष्ठ नेते बाळ खडपे यांच्या सौजन्याने रुग्णांना ग्लुकोज बिस्किटे व ऊर्जा पेयांचे वाटप करण्यात आले. तर भाजपा कार्यालय, जामसंडे येथे नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेवक संतोष तारी यांच्या वतीने मच्छी विक्रेत्या महिलांना व्यावसायिक वापरासाठी मोठ्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले.


या सर्व कार्यक्रमांना माजी आमदार अजितराव गोगटे, जेष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील,शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष धुरी,नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, संजय तारकर, उमेश कणेरकर, व्ही. सी. खडपकर, महिला मोर्चा पदाधिकारी प्राजक्ता घाडी,मिलिंद माने, धर्मराज जोशी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेअर करा