“देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या’च्या जयघोषात विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी
देवगड,दि.२६ ऑगस्ट
“देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या…” या अभंगाच्या भक्तिमय स्वरांनी आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठूचा गजर हरिनामाचा” या जयघोषाने देवगड येथील श्री विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सप्तप्रहार श्री हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
यावेळी अनिकेत पारकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. मंदिराचे पुजारी प्रथमेश बोंडाळे यांनी धार्मिक विधी पार पाडत पूजा सांगितली. दरवर्षीप्रमाणे उद्योजक नंदकुमार घाटे यांनीही श्री विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा केली. यावेळी नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी तसेच माजी सरपंच सुधीर ढोके, भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.

हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. “विठ्ठल विठ्ठल जय हरी”च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. आनंदवाडी येथील ग्रामस्थांसह विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भक्तिमय सोहळ्यास आनंद कुलकर्णी, उत्तम पोकळे, सुनील पारकर, विजय शिरसाट, अमित पारकर, मकरंद शिरसाट, सोहम पारकर, भाऊ पारकर, दिनोद पारकर, अभिषेक शिरसाट, रुपेश कुबडे, दत्ता पारकर, प्रशांत पोकळे, अनिल कोरगावकर,माजी नगरसेवक विकास कोयंडे ,स्वच्छता सभापती बुवा तारी,नगरसेवक संतोष तारी, शरद शिंदे ,जयराम कदम यांच्यासह असंख्य विठ्ठलभक्तांची उपस्थिती लाभली.
दरम्यान, सप्ताहाच्या निमित्ताने विठ्ठल दिंडी, साईनाथ दिंडी तसेच देवगड बाजारपेठ दिंडीच्या वतीने रात्री दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंड्यांमध्ये आकर्षक धार्मिक देखावे सादर करण्यात येणार असून, नागरिकांना व भाविकांना भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.

सप्तप्रहार श्री हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून देवगड परिसरात भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर जागर होत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम सप्ताहाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


