जामसंडे येथे आंबा-काजू बागायतदार संघटनेची बैठक; औषध खरेदी, बनावट औषधे आणि कथित आर्थिक लुटीच्या चौकशीची मागणी
देवगड,दि.१८ ऑक्टोंबर
गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे जाहीर झालेल्या ५० टक्के भरपाईची रक्कम अद्याप अनेक आंबा-काजू बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही. ही रक्कम तातडीने जमा करावी, तसेच बाफर्ड आणि देवगडमधील ‘अ’ विभागातील वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
येत्या हंगामात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच बागायतदारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी देवगड तालुका आंबा-काजू बागायतदार संघटनेची बैठक जामसंडे येथे पार पडली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडले.
या बैठकीला आंबा बागायतदार पुंडलिक नाणेरकर, दिनेश धुवाळी यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते. यावेळी औषध खरेदीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला. देवगडमधील औषध विक्रेत्यांनी उधारीवर औषधे देणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांची जुनी बिले थकीत आहेत, त्यांनी यापुढे देवगडमधील संबंधित दुकानदारांकडून रोखीनेही औषध खरेदी न करता तालुक्याबाहेरून किंवा जिल्ह्याबाहेरून औषधे खरेदी करावीत, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. मागील वर्षाचे पैसे द्यायचे की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे काका ढोके यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, दुकानांमधील बोगस औषधविक्री तसेच अनधिकृत गोदामांवर कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये ‘शेतकरी दाखला’ या नावाखाली काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कथित आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
एकीकडे मागील हंगामातील नुकसानीची भरपाई अद्याप पूर्णपणे मिळालेली नसताना दुसरीकडे आगामी हंगामातील संभाव्य दुष्काळ, औषध खरेदीतील अडचणी आणि अन्य प्रशासकीय प्रश्नांमुळे बागायतदारांसमोर आव्हाने उभी आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली.