दोडामार्ग, दि. ३० जून
प्रशासनाने रस्ता खुला करण्याचे आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे झरे-२ येथील ख्रिश्चन समाज बांधवांनी आज, मंगळवार दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
एक वर्षापासून प्रश्न प्रलंबित
आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने सक्तीची मोजणी करून रस्ता मोकळा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्याला आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आले तरी रस्ता खुला झालेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय वाढत आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
रस्ता खुला करणे: ख्रिश्चन वाडी ते झरे २ कडे जाणारा पुनर्वसन विभागाचा जुना रस्ता तात्काळ मोकळा करावा.
जमीन घोटाळ्याची चौकशी: पुनर्वसनजवळील २० गुंठे जागेची बेकायदेशीरपणे दोनवेळा विक्री करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.
नुकसान भरपाई: कोणताही संबंध नसताना खोट्या कोर्ट केसेसमुळे झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासापोटी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी.
अतिक्रमण हटाव: झरे २ मधील पुनर्वसन भागात झालेले इतर सर्व अतिक्रमण चौकशी करून तात्काळ हटवावे.
मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे.