धाटवाडीतील तिलारी कालव्याशेजारील जागेत प्लांट उभारणीचा मुद्दा चर्चेत; भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन.
दोडामार्ग, दि. १५ आॅक्टोबर
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात अनेक नियम धाब्यावर बसवून नगरपंचायत यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम शेड, उभारणी केली जात आहे, यावर नगरपंचायत कडून कारवाई होत नाही यामुळे यात भर पडत चालली आहे. दोडामार्ग शहरात धाटवाडी तिलारी कालव्याच्या शेजारी काही एकर जमीन मध्ये ग्रीन झोन वन संज्ञा घोषित केलेल्या जागेत आर एम. सी. प्लॉट उभारणी केली ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी नगरसेवक यानी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सदर प्लांट काढून टाकावा अशी मागणी केली आहे.
दोडामार्ग ते आयी रोडवर धाटवाडी तिलारी कालव्याच्या शेजारी मिरकर यांच्या घराजवळ हा खडी सिमेंट मिक्स करणारा आर एम सी प्लांट तो देखील वन विभाग यांनी जाहीर केलेल्या ग्रीन झोन मध्ये कसा उभा राहू शकतो नगरपंचायत प्रशासन काय करते
निवेदन देऊन संबंधित अधिकारी कारवाई का? करत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक, संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, नगरसेविका, सोनल म्हावळणकर, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, यांनी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले पण अद्याप कारवाई झालेली नाही.
तिलारी कालव्याच्या दुरुस्ती करण्यासाठी हा प्लांट उभा करण्यात आला. संबंधित ठेकेदार कडून आवश्यक परवानगी तसेच वन विभाग कडून परवानगी घेतली गेली नाही. शिवाय वनसंज्ञा घोषित जागेतील तसेच बाजूला लोकवस्ती आहे. या ठिकाणी प्रदूषणकारी प्लांट उभा करेपर्यंत नगरपंचायत प्रशासन काय करत होते हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सत्ताधारी नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर इतर नगरसेवक यांनी निवेदनात म्हटले आहे कसई दोडामार्ग शहरातील धाटवाडी येथे अंकुश मिरकर यांच्या घराशेजारी म्हावळंकरवाडी ते धाटवाडी कालव्याच्या बाजूला आर एम सी प्लांट बेकायदेशिरपणे उभारण्यात आलेला आहे. सदरचा प्लांट हा शहर विकास आराखड्यामध्ये ग्रीन झोन (फॉरेस्ट) हे आरक्षण असलेल्या जागेमध्ये उभारण्यात आलेला आहे. हे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशिर आहे. हा आर एम सी प्लांट तात्काळ काढून टाकण्यात यावा असे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना आम्ही देवून पण आजपर्यंत त्या आर एम सी प्लांट वर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा वेकायदेशिर कामांना नगरपंचायत प्रशासन सहकार्य करीत असल्याचे आमच्या निदर्शनास येत असून आपल्याला विनंती आहे की, बेकायदेशिर आर एम सी प्लांट बाबत चर्चा करणे हा विषय २६ ऑक्टोंबरच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा असे म्हटले आहे. आता नगरपंचायत काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान नगरपंचायत येथे संपर्क साधला असता याबाबत नोटीस बजावली आहे. असे सांगण्यात आले.