कै. ॲड. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शेअर करा

सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर व कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम; सावंतवाडी क्रमांक ६ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करून जपली सामाजिक बांधिलकी

​​सावंतवाडी, दि. १८ जून
कै. ॲड. श्रीधर सावळाराम पराडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर पराडकर आणि कुटुंबीयांच्या वतीने कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (वह्यांचे) वाटप करण्यात आले.


​कार्यक्रमाच्या वेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी पराडकर कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी पराडकर कुटुंबाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. याचा होतकरू विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल आणि ते आपले भवितव्य उज्ज्वल करतील. कै. ॲड. श्रीधर पराडकर यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीत नेहमीच वक्तशीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा जोपासला. तसेच सुधीर पराडकर यांनीही रिक्षा युनियन, रक्तदान चळवळ आणि रिक्षा युनियनच्या पतसंस्थेच्या माध्यमातून समाजात भरीव कामगिरी केली आहे.”


​याप्रसंगी डॉ. कविता पराडकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. “विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली पाहिजे. मी स्वतः डॉक्टर म्हणून आज ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वैद्यकीय सेवा देत आहे. विद्यार्थ्यांनीही भविष्यात आपले करिअर करताना समाजसेवेसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. तर, सावंतवाडी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी समाजातील सर्वांनीच हातभार लावण्याचे आवाहन केले.
​शाळेला ५ हजार रुपयांची देणगी:


जिल्हा परिषद शाळा नंबर ६ च्या कौतुकास्पद आणि यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत बजरंग दलाचे पर्यवेक्षक श्री. दिनेश गावडे यांनी शाळेला तब्बल ५ हजार रुपयांची आर्थिक देणगी जाहीर केली. कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवरांनी पराडकर कुटुंबीयांचे आभार मानले आणि शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्री. अभिमन्यू लोंढे, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी, शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर, माजी नगरसेवक श्री. संजय पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर पराडकर, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष तळवणेकर, बजरंग दलाचे पर्यवेक्षक श्री. दिनेश गावडे, डॉ. कविता पराडकर, राजे प्रतिष्ठानचे श्री. शिवा गावडे, मुख्याध्यापक केशव जाधव,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. समीक्षा खोचरे, शिक्षिका श्रीम. सायली लांबर आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.


​कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर यांनी केले, तर सुत्रसंचलन मुख्याध्यापक केशव जाधव यांनी आणि उपस्थितांचे आभार डॉ कविता पराडकर यांनी मानले.

शेअर करा