मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छीमारांसाठी मोफत सेवा शिबिराचे आयोजन

शेअर करा

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, GAIS विमा संरक्षण, NFDP नोंदणी व विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी

देवगड, दि. २० जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड मंडळाच्या वतीने मच्छीमार बांधवांसाठी विशेष मोफत सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात हे शिबिर पार पडणार आहे. मच्छीमार बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा तसेच मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामध्ये मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सविस्तर माहिती, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) वर मोफत नोंदणी, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजनेबाबत मार्गदर्शन तसेच मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध विविध अनुदान योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

याशिवाय मच्छीमारांसाठी अपघात विमा संरक्षण योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधांची माहिती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित महिला व पुरुष, नौका मालक, मच्छीमार सहकारी संस्थांचे सदस्य तसेच मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आणि मच्छीमार समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा