पालकमंत्री नितेश राणे यांच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना
कणकवली, दि.०२ सप्टेंबर
कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचे सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ४२ निवेदने प्रत्यक्ष, तर ५४ तोंडी अशी एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली आहेत. ही सर्व निवेदने तातडीने गणेशोत्सवापूर्वी मार्गी लाऊन सर्व कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
यावेळी महावितरण, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, बीएसएनएल आदी विभागांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश ऊर्फ सोनू सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचायत समिती कणकवलीच्या जनता दरबारामध्ये विविध विभागांशी संबंधित एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाकडे १६, बीएसएनएलकडे ५, महावितरणकडे २२, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २३, आरोग्य विभागाकडे १४ तर इतर विभागांकडे १६ निवेदने प्राप्त झाली आहेत.
पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विविध प्रश्नांची माहिती घेतली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जनता दरबारात आरोग्य सेवा, रस्त्यांची दुरुस्ती, एसटी बसच्या फेऱ्या, वीजपुरवठा तसेच बीएसएनएलच्या दूरसंचार सेवेसंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही भागांतील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत नागरिकांनी आपली भूमिका मांडली. त्यावर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
यावेळी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांसह आवश्यक मनुष्यबळ आणि इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे यावेळी सांगण्यात आले.
बीएसएनएलच्या सेवा आणि दूरसंचार सुविधांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचीही नोंद घेण्यात आली. जनता दरबारामध्ये नागरिकांना थेट आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित प्रश्नांबाबत माहिती देऊन आवश्यक त्या कार्यवाहीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी जनता दरबारास गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयतीलाल भांबरे, एसटी विभाग नियंत्रक प्रदीप घोडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.