​सावंतवाडी: मोती तलाव परिसरातील अनधिकृत बॅनरवर नगरपरिषदेचा चाप; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

शेअर करा

शहरात केवळ सात ठिकाणीच बॅनरला परवानगी; सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचा इशारा

सावंतवाडी,दि.२ सप्टेंबर
सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या सभोवताली बॅनर लावून शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्याना नगरपरिषदेने निर्णय घेऊन चपारक दिली आहे. शहरातील सात ठिकाणा व्यतिरिक्त बॅनर झळकले तर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी म्हटले आहे.

माहितीनुसार, उच्च न्यायालयातील जनहित याचिका १५५/२०११ च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार सावंतवाडी शहरामध्ये बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग उभारण्यासाठी सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या कालावधीत अनाधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सविस्तर नियमावली जाहीर केली आहे.
​बॅनर उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ७ जागा:
​एस. पी. के. कॉलेज कॉर्नर,
​नगरपरिषद कार्यालयाच्या गेट क्र. २ लगत,
​एसटी स्टँड समोरील भिंत,
​गरड तिठा मोरडोंगरी रस्त्यालगत,
​जुना शिरोडा नाका कॉर्नर,
​गवळी तिठा कॉर्नर,
​कुणकेरी रस्त्यालगत (बाहेरचा वाडा) या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली आहे.
​बॅनर लावण्याबाबतचे नियम व अटी:
​कोणताही बॅनर लावण्यापूर्वी किमान २४ तास अगोदर नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक राहील.
​प्रत्येक बॅनरसाठी सात दिवसांसाठी परवानगी दिली जाईल. त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने परवानगीचे नूतनीकरण करता येईल.
​प्रत्येक बोर्डवर क्यूआर कोड (QR Code) छापणे बंधनकारक राहील.
​बॅनरचा आकार जास्तीत जास्त ८ x १० फूट इतकाच असावा.
​परवानगीचा कालावधी संपल्यानंतर बॅनर लावणाऱ्या व्यक्तीने स्वतः ते बॅनर काढून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.
या निश्चित केलेल्या सात जागा सोडून अन्य कोणत्याही ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स किंवा होर्डिंग उभारल्यास त्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. संपूर्ण मोती तलाव परिसरात अथवा काठावर बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंग लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच या ७ जागांवरही अनधिकृत पोस्टर्स किंवा बॅनर्स आढळल्यास ते छापणारे व्यक्ती, संस्था किंवा पक्ष यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

शेअर करा