जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान; ग्रामपंचायत हळवलच्या सहकार्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार
कणकवली,दि.११ ऑक्टोबर:
कणकवली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभागाच्या वतीने दत्तक गाव असलेल्या हळवल (ता. कणकवली) येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जल संधारणाला चालना देण्यासाठी वनराई बंधारा उभारणी उपक्रम उत्साहात पार पडला.
ग्रामपंचायत हळवल आणि कणकवली कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत एकूण दोन वनराई बंधारे यशस्वीरित्या बांधण्यात आले. या श्रमदानात एनएसएसच्या 17 स्वयंसेवकांसह कॉलेजचे प्राध्यापक व NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण जगताप, प्रा. पुजा मुंज व डॉ. गणेश टेकळे हे सक्रियपणे सहभागी झाले होते. याशिवाय हळवल ग्रामपंचायतीचे सरपंच आर्या चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, हर्षदा सावंत(लिपिक), अनिल पाडवे (शिपाई), संदीप राणे (नळ कामगार) व इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वयंसेवकांना मोलाचे सहकार्य केले.

बंधारा उभारणीच्या वेळी एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे दगड मातीची रचना करणे जागेची स्वच्छता करणे आणि गोणपाटांमध्ये माती भरून बंधारा बांधण्याचे काम केले. या प्रत्यक्ष कामातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व समजण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. या वनराई बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल तसेच परिसरातील शेती आणि विहिरींच्या पाण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
